– सावरकरांचे नव्याने मूल्यमापन करण्याची वेळ – दिलीप करंबेळकर
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही कालातीत आहेत. त्यामुळेच राहुल गांधी आणि देशद्रोह्यांच्या फोरमला त्यांची भीती वाटते, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी रविवारी केला.
माय होम इंडियाचे संस्थापक आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या पुढाकाराने देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘साप्ताहिक विवेक’निर्मित ‘कालजयी सावरकर’ हा चरित्रपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी ‘विवेक’ समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देदीप्यमान विचार हे आजही पथदर्शक आहेत. त्यांनी सशस्त्र क्रांतीची ज्वाला भारतीयांमध्ये निर्माण केली. त्यामुळे त्यांचे विचार आणि तत्वज्ञान हे सदैव भारतीयांना चेतना देत राहतील, असे सुनील देवधर म्हणाले.
वीर सावरकर यांच्या विचारांची ब्रिटिशांना भीती होती, असे देवधर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सावरकरांच्या विचारांची भीती आजही देशद्रोह्यांना आहे. त्यामुळेच राहुल गांधी, काँग्रेस पक्ष, काँग्रेस समर्थक आणि कम्युनिस्टांचे फोरम हे आजही सावरकरांना घाबरते. कारण त्यांचे विचार हे आजही कालातीत आहेत. सावरकरांनी देशाला बळकट करण्याचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले असून भारत बलशाली झाला आहे, असेही देवधर यांनी नमूद केले.
दिलीप करंबेळकर म्हणाले की, सावरकर यांचे जीवन एका तासात मांडणे शक्य नाही, त्यांचे जीवनाचे विविध पैलू आहेत. मार्सेलीसमध्ये त्यांना अटक केली. त्यावेळी ८ ते १० युरोपियन देशांमध्ये त्याची चर्चा झाली होती. देशाबाहेर राहूनही क्रांती करण्याची त्यांची क्षमता होती. ते आंतरराष्ट्रीय क्रांतिकारक होते. ते अंदमानमध्ये असताना जर्मन पाणबुडी त्यांच्या सुटकेसाठी फिरत असे.
सावरकरांचे मूल्यमापन वेगळ्या पद्धतीने करण्याची वेळ आली असल्याचे सांगून करंबेळकर पुढे म्हणाले, आज सावरकरांच्या विचारांवरच बलशाली अशा नवभारताची निर्मिती होत आहे. सावरकरांचा विचार काल, आज आणि उद्याही कालातीत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात वीर सावरकर पर्यटन सर्किटची सुरुवात राज्य पर्यटन विभाग करत आहे. भगूरमध्ये सावरकर चरित्र थीम पार्क उभारले जाणार आहे, अशीही माहिती करंबेळकर यांनी यावेळी दिली.



