41.5 C
New Delhi
June 5, 2026
News from States

स्वरसम्राज्ञीच्या सुरेल आठवणी

sunil deodhar

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वप्रचारक, भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर आणि आसाममधील उद्योजक विनोद बावरी यांनी एकत्र येऊन “माय होम इंडिया” या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची स्थापना केली.२००५ साली स्थापना झालेल्या या संस्थेने गेल्या जवळपास दोन दशकांत विविध क्षेत्रांमध्ये भरीव समाजकार्य केले आहे.

संस्थेचे प्रथम उद्दिष्ट ईशान्य भारतातील लोकांना उर्वरित भारतामध्ये आपलेपणा मिळावा, प्रेम मिळावे, कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आणि उर्वरित भारतातील लोकांना ईशान्य भारताविषयी माहिती करून देणे हे होते. “सपनों से अपनो तक” या प्रोजेक्टमध्ये बालगृहात खितपत पडलेल्या दुर्दैवी लहान मुलांसोबत मैत्री करून व संवाद साधत, त्यांच्या आई वडिलांचे किंवा पालकांचे पत्ते शोधून त्यांच्या पालकांपर्यंत नेऊन पोचविणे हे काम केले जाते. आतापर्यंत संस्थेने ३००० पेक्षा जास्त मुलांना त्यांच्या घरी पोचवले आहे.

कालांतराने सामाजिक सुरक्षितता, राष्ट्रवाद, स्वच्छ भारत, सामाजिक समरसता, आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रात संस्थेचे उपक्रम सुरू झाले आहेत. साहित्य कला क्रीडा चित्रपट संगीत इत्यादी क्षेत्रांमध्येही गेल्या काही वर्षांत सामाजिक कार्य सुरू झाले आहे. संगीत विषयक एखादा कार्यक्रम करून त्यात काही कलाकारांचा गौरव करणे त्यांची ओळख समाजाला करून देणे, हाही आमच्या संस्थेच्या उद्दिष्ट्यांपैकी एक आहे.

या हेतूने संस्थेचे संस्थापक श्री सुनील देवधर यांच्या संकल्पनेतून एक नवीन उपक्रम २०२२ साली सुरू करण्यात आला. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. श्री. सुनील देवधर हे अनेकांप्रमाणेच लतादीदींचे चे निस्सिम चाहते आहेत. त्यांना लतादीदींच्या भेटीचा योग आला होता. जवळपास दोन तास झालेल्या या भेटीदरम्यान लतादीदींनी सुनील देवधर यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त करून दिला. सिने संगीताच्या विविध पैलूंवर त्यांची मते व्यक्त केली. एखाद्या जाहीर कार्यक्रमांद्वारे लता मंगेशकर यांची एक वेगळी ओळख लोकांना करून द्यावी अशी श्री देवधर यांची मनोकामना होती. त्यानिमित्ताने संस्थेतर्फे संगीत क्षेत्रातील यशस्वी तसेच उदयोन्मुख कलाकारांचा सन्मान करावा अशी कल्पना पुढे आली.

२८ सप्टेंबर हा लतादीदींचा जन्मदिवस. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या वाढदिवशी पुण्यात यशवंत नाट्यगृहात पहिला लता मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला.

यंदा ‘माय होम इंडिया’ आपला तिसरा लता मंगेशकर पुरस्कार गणेश कला क्रीडा मंदिर येथे आयोजित करत आहे. २८ डिसेंबर २०२४ रोजी हा कार्यक्रम संपन्न होईल यंदा या कार्यक्रमाचे शीर्षक आहे “दिल तो है दिल”. कल्याणजी आनंदजी या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी श्री आनंदजी शहा यांची सन्माननीय उपस्थिती असेल. ९१ वर्षे वयोमान असूनही आजही अखंड ऊर्जा अंगी असलेले श्री. आनंदजी या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.

या जोडीने संगीतबद्ध केलेल्या लता मंगेशकर आणि त्यांचे सहगायक यांनी गायलेल्या सुरेल गीतांची मेहफिल रंगेल. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे निवडक कलाकारांना पुरस्कार प्रदान केले जातील.
पुरस्कारार्थी मध्ये आग्रा, जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सौ. आरती अंकलीकर टिकेकर,
बेला संजीव शेंडे या हिंदी, मराठी तसेच तमिळ चित्रपट सृष्टीतील एक आघाडीच्या पार्श्वगायिका,
भारत रत्न आदरणीय लता मंगेशकर ह्यांच्यावर लिहिले गेलेल्या, न भूतो न भविष्यति अश्या ‘लता श्रुति-संवाद’ ह्या ग्रंथाचे लेखक श्री. अजय आशा यशवंत देशपांडे,
श्री. अरविंद गजेंद्रगडकर आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य सुप्रसिद्ध बासरी वादक श्री. सुनील अवचट,
प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा दातार, ज्या गेली 20 वर्षे कर्ण बधीर मुलींना कत्थक नृत्याचे धडे देतात, तसेच कष्ट, चिकाटी, राष्ट्रप्रेम आणि सेवाभाव याचा वारसा घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शक उपक्रम राबविणारे डॉ. विनोद शहा यांना या कार्यक्रमात माय होम इंडिया जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी केरलाचे राज्यपाल माननीय श्री राजेंद्र आर्लेकरजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सर्वसाधारणपणे असे मोठे संगीताचे कार्यक्रम निधी संकलन करण्यासाठी केले जातात. परंतु आमच्या देणगीदारांच्या सौजन्याने आणि आशीर्वादाने आम्ही हा कार्यक्रम लोकांसाठी विनामूल्य ठेवत असतो.

गणेश कला क्रीडा मंदिर, स्वारगेट पुणे येथे शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळात होणाऱ्या या लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यास पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा ही विनंती