उद्या ११ जानेवारी २०२४ रोजी सोलापूरातून प्रारंभ भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांचे कुटुंबीय येणार
सोलापूर मधील हुतात्मा दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 11 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता सोलापूरच्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा आणि व्य. गो. अंदुरकर लिखित सोलापूर “मार्शल लॉ आणि चार हुतात्मे ” या पुस्तकाचा पुनर्प्रकाशन सोहळा हिराचंद नेमचंद लायब्ररी हुतात्मा चौक येथे वंदे मातरम संघटनेच्या वतीने आयोजित केला आहे.
सोलापूर मध्ये महात्मा गांधींच्या अटकेनंतर ब्रिटिशांविरुद्ध मे 1930 मध्ये मोठे जनआंदोलन झाले. तेव्हा आंदोलनकारी वंदेमातरम च्या घोषणा देत होते. या लढ्याच्या माध्यमातून सोलापूरने चार दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले होते. ज्याची दखल ब्रिटिश पार्लमेंटला घ्यावी लागली होती. याचाच परिणाम संपूर्ण देशात फक्त सोलापुरात मार्शल लॉ लागू करण्यात आला आणि घटनांना जबाबदार म्हणुन श्री. मलप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, श्री जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना 12 जाने 1931 रॊजी फाशी देण्यात आले. देशभरात अशी राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याची उदाहरणं खूप मोजकी आहेत.
आज पुन्हा काही राष्ट्र विरोधी शक्ती जात- पात धर्म किंवा प्रदेश यांचा खोटा अभिमान दाखवून आपापसात फूट पाडून राष्ट्रीय ऐक्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत जे देशाला परवडणारे नाही. अशी संघटनेची प्रारंभापासून भूमिका आहे.वंदेमातरम संघटना कायम या शक्तींच्या विरोधात निडरपणे उभी राहिली आहे. संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत तर पुण्यातील दत्तात्रय गायकवाड यांनी पंजाब मध्ये शीख कुटुंबाला वाचविताना आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे.
1876 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदेमातरम या गीताला २०२६ साली 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वंदे मातरम संघटनेच्या वतीने पुढची 3 वर्षे संपूर्ण देशभरात राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याची चळवळ राबविली जाणार आहे. तसेच क्रांतिकारकांच्या गावी अथवा स्मृती स्थळी भेट देऊन तिथल्या युवकांच्या सोबतीने सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याचे कार्यक्रम घेणार आहे.यानिमित्ताने क्रांतीकारक तसेच देशभक्तांच्या जीवनावरील एकुण १५० पुस्तके प्रकाशित करण्याची योजना आहे, त्याचा प्रारंभ क्रांतिभूमी सोलापूर शहरातून हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. देशातील हा पहिलाच कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमासाठी शहीद भगतसिंग यांचे पुतणे सरदार किरणजीत सिंग, क्रांतिवीर बटुकेश्वर दत्त यांची मुलगी भारती दत्त बागची तसेच देशाचे माजी गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे व सोलापूर मधील हुतात्म्यांचे वंशज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.







