शुध्द व निखळ पत्रकारितेची गरज : अनंत बागाईतकर, राजधानीत मराठी पत्रकारदिन साजरा

Sarkaritel
By Sarkaritel January 10, 2020 09:54

शुध्द व निखळ पत्रकारितेची गरज : अनंत बागाईतकर, राजधानीत मराठी पत्रकारदिन साजरा


नवी दिल्ली, ०६ : पत्रकारितेपुढे असलेल्या विविध आव्हानांचा मुकाबला करून शुध्द व निखळ पत्रकारिता करण्याचे आवाहन दैनिक सकाळचे दिल्ली ब्युरो चिफ अनंत बागाईतकर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाअंतर्गत’ आयोजित ‘मराठी पत्रकारदिन कार्यक्रमात’ श्री. बागाईतकर बोलत होते. मराठी भाषा संवर्धन व पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते दिल्लीत कार्यरत एकूण सात ज्येष्ठ पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉंडंटचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, प्रेस क्लब ऑफ इंडियाचे महासचिव तथा दैनिक सकाळचे दिल्ली ब्युरो चिफ अनंत बागाईतकर, राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी, दैनिक लोकमत दिल्लीचे संपादक विकास झाडे, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे सहयोगी संपादक सुनिल चावके, दैनिक पुढारीचे सहयोगी संपादक श्रीराम जोशी आणि सरकारीटेल पोर्टलचे संपादक अमेय साठे यांचा यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

सत्कारानंतर बोलताना श्री. बागाईतकर म्हणाले, पत्रकारांची भूमिका ही ‘जागल्याची’ अर्थात जनतेला जागरूक करण्याची व त्यांना येणा-या संकटाविषयी सचेत करण्याची असते. मात्र, ही भूमिका पार पाडण्यासाठी आजच्या पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने आहेत. यात मुख्यत्वे राजसत्तेकडून पत्रकारितेला नियंत्रित करण्याचा होणारा प्रयत्न, पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारिताक्षेत्रात लेखनाच्या आशयावर होणारा तंत्रज्ञानाचा वरचष्मा यांचा समावेश आहे. पत्रकारितेपुढील अशा विविध आव्हानांचा मुकाबला करून शुध्द व निखळ पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे मत श्री. बागाईतकर यांनी यावेळी मांडले. प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देशाच्या विविध भागातील पत्रकारांच्या समस्या सोडवितांना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी कथन केले.

विजय नाईक म्हणाले, गेल्या ४५ वर्षातील माझ्या दिल्लीच्या पत्रकारितेत मराठी पत्रकारांचा वाढलेला टक्का सुखावह आहे. सुरुवातीच्या काळात दिल्लीत कार्यरत आम्ही केवळ ४ पत्रकार होतो आणि आता हा आकडा वाढून १५० झाला आहे. डिजीटल व व्हिजुअल मिडीयामुळे पत्रकारितेत विविध संधी निर्माण झाल्याने हा आकडा वाढला असून हे आनंददायी चित्र असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील मराठी पत्रकारितेला तटस्थपणे पत्रकारिता करण्याची परंपरा आहे. सरकारच्या चुकांवर टिका करण्यातही या पत्रकारांनी लेखनी चालविली असल्याचे ते म्हणाले. तटस्थ पत्रकारिता करण्यासाठी पत्रकारांनी राजकारण्यांपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

अमेय साठे यांनी सरकारीटेल पोर्टलच्या माध्यमातून सकारात्मक पत्रकारीतेसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तालुका आणि जिल्हा स्तरावर घडणा-या सकारात्मक गोष्टी जनतेसमोर मांडणे व त्यांना प्रशासनातील महत्वाचे संपर्क क्रमांक एकाच मंचावर उपलब्ध करून देण्यासाठी २००१ मध्ये सरकारीटेल पोर्टलची सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

व्यंकटेश केसरी म्हणाले, महाराष्ट्रात पत्रकारिता करताना त्या-त्या भागातील प्राप्त परिस्थितीनुसार विविध‍ विषयांकडे आम्ही पाहत असू. मात्र, दिल्लीत पत्रकारिता करताना विविध विषयांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पैलू कळले व ते वाचकांपर्यंत पोचवता आले. पत्रकारितेत बदल होणे अपरिहार्य असून या क्षेत्रात विविध आव्हानेही आहेत. मात्र, पत्रकारीतेत असलेली अस्थिरतेची जाणीव असतानाही या क्षेत्रात कार्यरत पत्रकार निकराने कार्य करतात व कामाचा आनंद घेतात असेही श्री. केसरी म्हणाले.

श्रीराम जोशी यांनी सांगितले, महाराष्ट्र परिचय केंद्रामुळेच दिल्लीत मराठी पत्रकारांचा सन्मान होऊ शकला. हे कार्यालयाने पत्रकारांच्या मदतीसाठी सदैवच पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राचे आद्य संस्थापक भा.कृ.केळकर यांचा स्मृतीदिन साजरा करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

विकास झाडे म्हणाले, दिल्लीत विविध राज्यांतील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी कार्यरत असून राजधानीतील पत्रकारीतेमध्ये प्रगल्भता व संयम हे मराठी पत्रकारांचे वैशिष्टय ठरले आहे. कोणत्याही विषयाबाबत भरकटून न जाता दिल्लीतील मराठी पत्रकारांनी संयमी लिखान केले असून हेच आमचे बलस्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनिल चावके म्हणाले, महाराष्ट्रातून दिल्लीत पत्रकारितेसाठी येणा-यांना येथील भाषा आणि विपरीत हवामानाचा सामना करावा लागतो. ज्या वृत्तपत्रांचे दिल्लीत ब्युरो ऑफिस नाहीत अशा पत्रकारांचा संघर्ष अधिक वाढतो मात्र, यात महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राची मोलाची साथ मिळते असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी निवासी आयुक्त समीर सहाय यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

Sarkaritel
By Sarkaritel January 10, 2020 09:54